Karnataka | Lok Sabha Election 2024 – भाजप प्रणित एनडीएने तीन माजी मुख्यमंत्र्यांना कर्नाटकमध्ये लोकसभेच्या शर्यतीत उतरवले आहे. त्यात बसवराज बोम्मई (हवेरी), जगदीश शेट्टर (बेळगाव) आणि एचडी कुमारस्वामी (मंड्या) यांचा समावेश आहे. बोम्मई आणि शेट्टार हे दोघेही लिंगायत समाजाचे आहेत.
वक्कलिंगा समाजाचे असलेले कुमारस्वामी हे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आहेत. कर्नाटकातील लोकसभेच्या एकूण २८ जागांपैकी भाजप २५ आणि जेडी(एस) तीन जागा लढवणार आहे. कुमारस्वामी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये सामील झाले होते.
१९४७ पासून कर्नाटकचे एकूण 23 मुख्यमंत्री झाले आहेत. त्यापैकी १४ जणांनी लोकसभा आणि दोन जणांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही संसदीय कारकिर्द केली आहे. त्यापैकी के सी रेड्डी, केंगल हनुमंथैया, वीरेंद्र पाटील, गुंडू राव, एस बंगारप्पा, वीरप्पा मोईली आणि बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर खासदार बनून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला होता.
एस निजलिंगप्पा, एचडी देवेगौडा, जे एच पटेल, एस एम कृष्णा, एन धरम सिंग, एच डी कुमारस्वामी आणि डी व्ही सदानंद गौडा या माजी मुख्यमंत्र्यांनीही संसदीय राजकारणात भाग घेत खासदारपद भूषवले आहे. एस आर बोम्मई आणि रामकृष्ण हेगडे यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून संसदीय कारकिर्द केली आहे.
बसवराज बोम्मई यंदा लोकसभा निवडणुकीत पदार्पण करत आहेत. कर्नाटकात गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा पराभव झाला होता. ते जनता परिवारातील दिवंगत ज्येष्ठ नेते एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत.
भाजपने जगदीश शेट्टर यांना बेळगाव (बेळगावी) मधून रिंगणात उतरवले आहे, त्यांनी भाजप मधून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता आता ते पुन्हा भाजप मध्ये परतले आहेत. हुबळी-धारवाड भागातील शेट्टर हे अंगडी कुटुंबाचे नातेवाईक आहेत. शेट्टर सुरुवातीला बेळगावीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते, त्यांना धारवाड हवे होते, ते भाजपने विद्यमान खासदार प्रल्हाद जोशी यांना दिले आहे.