T20 World Cup 2024, Hardik Pandya : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसत आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये त्याला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. बॉल आणि बॅटने त्याची कामगिरी निराशाजनक आहे. अशा परिस्थितीत त्याची टी-20 विश्वचषक संघात निवड होणे कठीण मानले जात आहे. दरम्यान, प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी पांड्याच्या निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. पहिल्या तीन सामन्यांत संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, संघाने दिल्लीविरुद्ध पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकले. आता संघाच्या नजरा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर खिळल्या आहेत. हार्दिक ( #HardikPandya ) आपल्या नेतृत्व कौशल्याने (कर्णधार म्हणून) क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे.
फलंदाजीसह गोलंदाजीतही ठरला फ्लॉप…
त्याचबरोबर गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो विशेष काही चमक दाखवू शकला नाही. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत फक्त एकच विकेट घेतली आहे. मागील पाच डावांमध्ये त्याने 11, 24, 34, 39 आणि 21* धावा केल्या आहेत. त्याचवेळी फलंदाजी करताना त्याची सर्वोच्च धावसंख्या 39 धावांची होती. अशा परिस्थितीत 30 वर्षीय अष्टपैलू खेळाडूची टी-20 विश्वचषक संघात निवड होणे कठीण मानले जात आहे.
भोगले यांचे धक्कादायक उत्तर…
हर्षा भोगले म्हणाले,” हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर त्याला टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळेल का? जर तो गोलंदाजी करत नसेल तर तो भारताच्या टॉप 6 फलंदाजांपैकी एक आहे का? मला त्याबद्दल पूर्ण खात्री नाही, कारण जर तो गोलंदाजी करत नसेल आणि तो फिनिशर म्हणूनही चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला वरच्या क्रमाकांवर फलंदाजी करावी लागेल, जिथे संघात खूप मजबूत स्पर्धा आहे.”
वर्ल्ड कप 2024 कधी होणार?
आयपीएलनंतर लगेचच टी-20 विश्वचषक 2024 सुरू होईल. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून ती 29 जूनपर्यंत खेळवली जाणार आहे. टीम इंडिया 5 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याचवेळी 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघ एकाच गटातील आहेत.