मेहसाणा – गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रेश्मा पटेल यांना मेहसाणा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने रेश्मा पटेल आणि मेवानीसह 10 आरोपींना दोषी ठरवले आहे.
मेहसाणा न्यायालयाने 2017 च्या स्वातंत्र्य मार्च रॅलीच्या संदर्भात ही शिक्षा सुनावली. या प्रकरणी जुलै 2017मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. मेवानी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परवानगी न घेताच स्वातंत्र्य मार्च रॅली काढली. हा आदेश पारित करताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. ए. परमार म्हणाले, रॅली काढणे हा गुन्हा नाही. परंतु परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा करणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल म्हणाल्या, आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण जनतेला न्याय मिळवून देणे हाही भाजपच्या राजवटीत गुन्हा आहे. कायद्याचा खोटा धाक दाखवून भाजप आमचा आवाज दाबू शकत नाही. जनतेच्या न्यायासाठी आम्ही सदैव लढत राहू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होत. यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला असून एक जण अद्याप फरार आहे.