भाजप नगरसेवकाकडून कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी – संविधान जनजागरण अभियानाअंतर्गंत आयोजित कार्यक्रमात उद्या दि. 18 रोजी (बुधवारी) सायंकाळी चार वाजता पिंपरीतील आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी दिली.
संविधान दिन सोहळा समिती व राष्ट्रीय दलित एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविले जात आहे. त्यानुसार शहरात दर महिन्याला व्याख्यानाचे आयोजन केले जाते. त्याचे 22 वे पुष्प गुंफण्यासाठी आमदार जिग्नेश मेवानी येणार आहेत. त्यांच्यासह संविधान तज्ज्ञ ऍड. असीम सरोदे, उदगीरचे नगरसेवक निवृत्ती सांगवे, स्वराज अभियानाचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी शिरुर तालुक्यातील भीमा कोरेगाव गावात हिंसाचार उसळला होता. त्यामुळे वर्षानुवर्षे शांततेत पार पडणाऱ्या येथील सोहळ्याला मागील वर्षी गालबोट लागले होते. मात्र, या घटनेनंतर पुण्यात भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी आमदार जिग्नेश मेवानी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये मेवानी यांचे व्याख्यान होत असल्याने त्याकडे विशेष लक्ष आहे. या कार्यक्रमाचे आयोजनही भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केल्याने तोही चर्चेचा विषय ठरला आहे.