“मनोमिलना’वर राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका

राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ “मावळ’चीच काळजी का?
पत्रकार परिषद घेऊन केली टीका ः “शिरुर’बाबत मात्र ठेवले होते मौन

आरोप घरचे होते का?

सार्वजनिक कामांवर आणि त्यातील भ्रष्टाचारावरील बारणे यांनी केलेले आरोप हे घरचे होते का? कधीही आरोप करायचे आणि मागे घ्यायचे याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल, असे प्रशांत शितोळे म्हणाले. हे मनोमिलन आर्थिक खिसेभरूच्या प्रकारातून झाल्याचाही आरोप शितोळे यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीची अस्वस्थता स्पष्ट

मनोमिलनानंतर तत्काळ पत्रकार परिषद घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची अस्वस्थता स्पष्ट दिसून येत होती. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शिरुर आणि मावळच्या उमेदवारीबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याच्या प्रश्‍नावरही केवळ थातूर मातूर उत्तरे देण्यात आली. दहा दिवसांपासून आढळराव- लांडगे यांच्या मनोमिलनावर चुप्पी साधणारे आज मात्र बारणे-जगतापांच्या मनोमिलनावर भरभरून बोलताना दिसून आले.

पिंपरी – भाजप-शिवसेना युतीच्या “मनोमिलना’वर राष्ट्रवादी कॉंग्रेसची दुटप्पी भूमिका आज उघड झाली. आठ ते दहा दिवसांपूर्वी शिरुर लोकसभा मतदारसंघातील मनोमिलनावर मौन बाळगणारी राष्ट्रवादी आज मावळ मतदारसंघातील मनोमिलनानंतर थेट मैदानात उतरली. “मावळ’बाबत जरा जास्तच आग्रही असलेल्या अस्वस्थ नेत्यांनी मनोमिलनावर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन युतीकडून गलिच्छ, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण सुरू असल्याचा दावा केला.

मावळ लोकसभा मतदारसंघात मनोमिलन झाल्याची घोषणा दुपारी दीड वाजता श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांनी करताच शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक डब्बू आसवाणी, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेवून या मनोमिलनावर टीका केली. यावेळी बोलताना वाघेरे म्हणाले, स्वार्थी हेतुने हे मनोमिलन झाले असून लाज कशी वाटत नाही यांना. ज्या लोकांनी सार्वजनिक कामांवर विशेषत: पंतप्रधानांच्या नावे सुरू असलेल्या योजनांवर टीका करून भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्यासोबतच मनोमिलन झाल्याचे जाहीर करतात, ही बाब दुर्देवी आहे.

प्रशांत शितोळे म्हणाले, पिंपरीतील एका मांडवली करणाऱ्याने ही सर्व मांडवली अगोदर केली आणि त्यानंतर वरिष्ठांसमोर केवळ नाटक करून हे मनोमिलन जाहीर करण्यात आले. लक्ष्मण जगताप हे ज्यांच्यासोबत राहतात त्यांचा पराभव नक्की होतो, हे आतापर्यंत 2009 आणि 2014च्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बारणे यांचा पराभव अटळ आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.