मान्सूनचे अंदाज, जरा जपूनच : जागतिक हवामान संस्थेचे आवाहन

पुणे -“एल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा भारतात मान्सून यंदा सरासरीपेक्षा कमी होणार आहे असा अंदाज वर्तविताना थोडी खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. पाऊस कमी पडण्यास फक्त “एल-निनो’ हा घटक कारणीभूत नसतो. मान्सूनचा अंदाज वर्तविताना अनेक पैलूंचा अभ्यास केला जातो. त्यामुळे मान्सूनचे अंदाज वर्तविताना थोडी काळजी घ्यावी, असे आवाहन जागतिक हवामान संस्थेने केले आहे.

हवामानविषयक माहिती देणाऱ्या एका खासगी संस्थेने नुकतेच देशात मान्सून कमी पडणार असल्याचे भाकित केले होते. त्यावेळी “एल-निनो’ मान्सूनवर परिणाम करणार, असेही स्पष्ट केले होते. पण, प्रत्यक्षात “एल-निनो’ हा कधी निर्माण होतो, त्याचा परिणाम हा पूर्ण मान्सूनवर पडतो. तो काही ठराविक कालावधीसाठी असतो, त्यानंतर मान्सूनचे ढग कशा प्रकारे प्रवास करतात. पॅसिफिक महासागरातील तापमानाचा किती फरक पडतो, असे अनेक घटक मान्सूनच्या अंदाज वर्तविताना अभ्यासले जातात. त्यामुळे एकट्या “एल-निनो’ला कारणीभूत ठरता येणार नाही.

“एल-निनो’ हा घटक आता पाच ते दहा वर्षांपासून निर्माण होऊ लागला आहे. त्यापूर्वी त्याला फारसे महत्त्व नव्हते.पॅसिफिक महासागरातील तापमान अचानक वाढले, तर उष्ण वारे हे मान्सूनच्या ढगांना पेरू देशाकडे घेऊन जातात. त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण होतो. त्यानंतर पुन्हा तापमान थंड झाले, की मान्सूनच्या ढगाचा वेग वाढत असतो. त्यामुळे “एल-निनो’ मान्सूनच्या काळात किती वेळा निर्माण होतो, हे आताच लगेच सांगणे शक्‍य नाही. त्यामुळे हवामानतज्ज्ञांनी घाई करू नये, असा सल्लाही जागतिक हवामान संस्थेने दिला आहे.

“एल-निनो’बाबत वेगवेगळ्या हवामान संस्थांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या अंदाजांबाबत जागतिक हवामान संस्थेने जाहीर केले आहे की, ‘मॉडेल आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या मार्च महिन्यात “एल-निनो’ कमकुवत आहे. जूनमध्ये “एल-निनो’ आणखी टक्‍क्‍यांपर्यंत कमकुवत होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या काळात दीर्घकाळाच्या दृष्टीने अनिश्‍चितता आहे. त्यामुळे “एल-निनो’च्या प्रभावाबाबत पूर्वानुमान देताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असेही संस्थेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.