अजितदादा मला परवानगी द्या, किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो; शशिकांत शिंदे आक्रमक

सातारा – राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. अशाप्रकारे भाजप व सोमय्या यांच्यावर शिंदे आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. ते साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

शशिकांत शिंदे म्हणाले की, आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं.

आपण परिणामांची चिंता करत नाही, असं सांगताना ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही. कारण सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं शशिकांत म्हणाले.

भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला मागे 100 कोटींची ऑफर दिली होती. कधी कधी वाटते ते 100 कोटी घ्यायला पाहिजे होते. पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.