सातारा – तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालामध्ये राजकीयदृष्टया संवेदनशील असलेल्या खेड, गोजेगाव ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. या दोन ग्रामपंचायतीवर आ. महेश शिंदे गटाच्या पॅनेलने परिवर्तन घडवले. तर चिंचणेर सं. निंबमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे गटाची सत्ता आली तर संभाजीनगर व खिंडवाडीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने सत्ता कायम ठेवली आहे.
उफळी ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाची सत्ता कायम राहिली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील चार तर सातारा मतदारसंघातील दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये शिंदे गटाकडे दोन, भाजप तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक ग्रामपंचायत मिळाली आहेत. मोठी ग्रामपंचयात असलेल्या खेडमध्ये प्रथमच सत्तांतर झाले.
यामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सरपंचपदाच्या उमेदवारासह 13 जागा जिंकल्या. आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या संयुक्त पॅनेलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महेश शिंदे गटातील समर्थकांनी पोवई नाक्यावर एकच जल्लोष केला. सातारा शहरानजिक असलेल्या संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाचीच दोन पॅनेल समोरासमोर होते. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे व उदयनराजे गट यांच्या नेतृत्वाखाली तिसरे पॅनेल अशी लढत होऊन खासदार उदयनराजे यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या. यामध्ये सरपंचपदाचे उमेदवार सतीश माने विजयी झाले. सरपंचपदाचे दादा तांगडे, गोरखनाथ नलवडे हे दोन्ही उमेदवार पराभूत झाले.
सरपंचपदासाठी संभाजीनगर येथे आठ उमेदवार रिंगणात होते. मात्र, स्थानिक गटनेत्यांतील निर्णयानुसार सरपंचपदाची निवडणूक तिरंगी झाली. यामध्ये उदयनराजे यांच्या गटाचे सतीश माने थेट सरपंच म्हणून निवडून आले. सामाजिक कार्यकर्ते हेमंत कदम यांनी स्वतंत्रपणे दोन अपक्ष उमेदवार निवडून आणले आहेत. खिंडवाडी ग्रामपंचायतीत खासदार उदयनराजे भोसले, आ. महेश शिंदे व माजी सभापती सुनील काटकर यांच्या गटाचे पॅनेल व दुसरे खासदार गट व आमदार शशिकांत शिंदे गटाचे पॅनेल अशी लढत झाली. यामध्ये उदयनराजे भोसले व आ. महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलने आठ जागा जिंकल्या असून विरोधी पॅनेलला तीन जागा मिळाल्या. या ग्रामपंचायतीत खासदार गटाची सत्ता कायम राहिली आहे.
पण, या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंच्या गटानेही दावा केला आहे.गोजेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रसचे आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाचे पॅनेल विरुध्द आ. महेश शिंदे यांच्या गटाचे पॅनेल अशी लढत झाली. यामध्ये आ. महेश शिंदे यांच्या पॅनेलने पाच जागा मिळवून सत्तांतर घडविले. विरोधी आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या. चिंचणेर सं. निंब ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाच्या पॅनेल विरुध्द आ. महेश शिंदे यांच्या गटाचे पॅनेल अशी दुरंगी लढत झाली. यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या. तसेच सरपंचपदाचा उमेदवारही राष्ट्रवादीचाच निवडून आलो. तर आ. महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वी या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची बिनविरोध सत्ता होती.
उफळी ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला करिश्मा दाखवत सातपैकी चार जागा बिनविरोध केल्या होत्या. तर उर्वरीतपैकी दोन जागांच्या निवडणुकीत त्यांच्याच विचाराच्या आल्या आहेत. या ग्रामपंचायतीत एका जागेवर ओबीसी आरक्षण असल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक झालेल्यामध्ये सर्व जागा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सातारा तहसील कार्यालय येथे सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीवेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आला होता. विजयी उमेदवारांनी सातारा शहरातून गुलाल उधळत रॅली काढली.