Navara Maza Navsacha 2 : अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ यांचा 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासह त्यातील गाणी देखील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली होती. आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाचा पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सचिन यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. आता 2024 साली त्याच्या दुसऱ्या भागाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी शेअर केलेल्या एका पोस्टवरून ही माहिती मिळाली आहे.
View this post on Instagram
जयवंत वाडकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या क्लॅपचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे, ‘नवरा माझा नवसाचा 2 ….चित्रपटाचे चित्रीकरण उद्यापासून सुरू होत आहे. तुमचे आशीर्वाद पाठिशी राहू द्या.’ जयवंत वाडकर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील सचिन पिळगावकर हेच करणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला आज 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, जयवंत वाडकर अशोक सराफ, रीमा लागू, विजय पाटकर, कुलदीप पवार, सतिश तारे, प्रदीप पटवर्धन, अतुल परचुरे, आनंद अभ्यंकर, विकास समुद्रे, अली असगर, सुनिल तावडे, वैभव मांगले, मधुराणी गोखले, जॉनी लिव्हर हे कलाकार होते.