मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’ (Me Honar Superstar Chhote Ustaad 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदाच्या या कार्यक्रमाचा संकल्प काळे विजेता झाला आहे. महाअंतिम सोहळ्यादरम्यान त्याच्यासोबत इतर सहा स्पर्धक होते. मात्र संकल्पने ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजेते पदानंतर त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली होती. अकोल्याची श्रुती भांडे या शोची उपविजेती ठरली. तर नाशिकच्या सृष्टी पगारेने तृतीय क्रमांक पटकावला. विजेता संकल्प काळेला बक्षीस म्हणून चार लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. या महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, मधुरा कुंभार, शरयू दाते उर्मिला धनगर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी हजेरी लावली होती.
विजेतेपदानंतर संकल्प काळेने प्रतिक्रिया दिली आहे. “आतापर्यंत मी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पण छोटे उस्तादच्या मंचाने मला संधी दिल्याने मला माझी कला सादर करता आली. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. इतक्या दिवसांच्या मेहनतीचे फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे.” या शोमध्ये सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे जजच्या भूमिकेत होते.
त्यांच्याबद्दल बोलताना संकल्प म्हणाला की, “सचिन पिळगावकर, वैशाली आणि आदर्श शिंदे हे मला गुरुच्या रुपात मिळाले. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.” दरम्यान, ‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’ च्या पहिल्या पर्वाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.