गणेश घाडगे
-समोरासमोर लढतीमुळे गडाख अडचणीत
-पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती होणार का?
नेवासे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नेवासे विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे घड्याळ हे पक्ष चिन्ह गायब झाले आहे. पक्षाने उमेदवारी जाहीर करून देखील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेरच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नाही. परिणामी राष्ट्रवादीचा उमेदवार या निवडणुकीत नसल्यामुळे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात समोरासमोर लढत होणार असल्याचे गडाख चांगलीच अडचणीत सापडले आहेत.
राष्ट्रवादीचा उमेदवारच नसल्याने आता राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. गडाखांशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सख्ये नसल्याने सहाजिकच या नेत्यांकडून भाजपच्या उमेदवाराला मदत झाली तर गडाखांना एकाकी झुंज द्यावी लागणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे 2019 ची विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अंतचं म्हणावा लागेल. कारण तालुक्यात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना असतांना राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची तालुक्यात चांगली पकड असून देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीतून सपशेल माघारी घेत एकाही उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची नामुष्की आली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असेल, कोण अर्ज दाखल करणार याबाबत उत्सुकता लागली असतांना अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाकडून कोणीच उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी फिरकले नाही.
अर्थात दोन दिवसांपूर्वी लंघे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पांडूरंग अभंग यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह धरण्यात आला. परंतु त्यांनी देखील नकार दिला. त्यामुळे घुलेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीला उमेदवार तर मिळाला नाही. उलट बाय देण्याची नामुष्की ओढवल्याने राष्ट्रवादीचे तालुक्यातील अस्तित्व संपुष्ठात आल्याचे दिसत आहे. नेवाश्याच्या राजकारणामध्ये कायम राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला. गडाख -घुले यांच्या रूपाने राष्ट्रवादी तालुक्यातील घरा-घरामध्ये पोहचली होती, मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव झाला.
या पराभवाचे खापर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या माथी फोडून गडाखांनी वेगळी चुल मांडली. क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना करून या पक्षाच्या माध्यमातून नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकां लढविल्या. या माध्यमातून पुन्हा गडाखांनी नव्या पक्षाची बांधणी केली. परंतु हे करीत असतांना विधानसभेची तयारी मात्र त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केली. घुलेंनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून यापूर्वी माघारीचा निर्णय घेतला होता. आता नेवासेत कोण उमेदवार अशी चर्चा होती. पण या मतदारसंघाही उमेदवार देता आला नाही.
लंघे यांचे नाव तसे सहा महिन्यांपासून होते. त्यांनी त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली होती. पण वातावरण पाहिल्यानंतर त्यांनी माघारीचा निर्णय घेतला. 2004 व 2009 मधील लंघे यांचा निसटता पराभव आजही तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये सलत आहे. ही सल जनतेला लंघे यांना आमदार करून भरून काढणार अशी आशा असतांना लंघे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्याने मुरकुटे व गडाख यांच्यात सरळ लढत होत असल्यामुळे गडाखांची अडचण वाढली असून पुन्हा सन 2014 ची पुर्नरावृत्ती होती की काय अशी शंका व्यक्त होत आहे.
लंघे यांचा भाजपत प्रवेश?
नेवासे तालुक्यात राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून आ. मुरकुटे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतांना मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी देखील हजेरी लावली होती. याचवेळी सभेच्या ठिकाणी विठ्ठलराव लंघे उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर आता लंघे यांची भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली. तरी भाजपने लंघे यांना काय देऊ केले, हे मात्र गुपितच असल्याने तालुक्यातील लंघे समर्थक शनिशिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदाची चर्चा करीत आहेत.