12 वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 13व्या योनेक्स सनराईज-एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात रायन कुथार्थ, वंश कामरा, अर्णव बिशोई यांनी, तर मुलींच्या गटात एंजल पटेल, सुमेरा जैस्वाल, माही खोरे, आनंदी भुतडा, अवनी चितळे, ऐश्वर्या जाधव, वाण्या श्रीवास्तव, लक्ष्मी दांडू या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात केरळच्या रायन कुथार्थ याने पाचव्या मानांकित तेलंगणाच्या वेंकट बटलंकीचा 3-6, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. दिल्लीच्या वंश कामराने सहाव्या मानांकित कर्नाटकाच्या रुरीक रजीनीचे आव्हान 4-6, 6-3, 6-3 असे संपुष्टात आणले. तेलंगणाच्या बिगरमानांकीत अर्णव बिशोई याने बाराव्या मानांकित महाराष्ट्राच्या समर्थ संहिताचा टायब्रेकमध्ये 6-7(3), 6-4, 6-1 पराभव केला.
मुलींच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या गुजरातच्या एंजल पटेल हिने चौथ्या मानांकित उत्तरप्रदेशच्या सौमित्रा वर्माचा 3-6, 6-2, 6-0 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. पश्चिम बंगालच्या सुमेरा जैस्वालने कडवी झुंज देत पाचव्या मानांकित आंध्रप्रदेशच्या लक्ष्मी रेड्डीचा 4-6, 6-4, 6-3 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
क्वालिफायर महाराष्ट्राच्या माही खोरेने अकराव्या मानांकित तेलंगणाच्या थानिया गोगुलमंडाचा 6-3, 6-0 असा तर, महाराष्ट्राच्या आनंदी भुतडाने बाराव्या मानांकित कर्नाटकाच्या संजना देवीनेनीवर 6-1, 6-0 असा विजय मिळवला. अवनी चितळेने तेराव्या मानांकित पश्चिम बंगालच्या साईजयनी बॅनर्जीचा 3-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधवने दिल्लीच्या चौदाव्या मानांकित आहना कौरचे आव्हान 7-5, 6-0 असे मोडीत काढले.