आकुर्डी – सीएसआर अंतर्गत आकुर्डी येथील जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या वतीने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या 34 शिक्षकांना सेमी इंग्रजीचे प्रशिक्षण दिले गेले. या प्रस्तावानुसार महापलिकेच्या बालवाडी व इयत्ता पहिली ते तिसरीच्या शिक्षकांकरिता सेमी इंग्रजीचे प्रशिक्षण, उपचारात्मक व इतर विषयांचे प्रशिक्षणही देण्यात आले. बजाज एज्युकेशन इनिशिएटिव्ह अंतर्गत शिक्षण प्रशिक्षण आणि इतर शैक्षणिक कामासाठी महापालिकेच्या 63 शाळांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये जानकीदेवी बजाज संस्थेस विनामुल्य प्रशिक्षण आयोजित करणे, शाळांमधील वेळोवळी आढावा घेवून व त्या संदर्भातील शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहून माहिती व अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच नियोजनाबाबत चर्चा करणे, संपूर्ण कामावर नियंत्रण ठेवणे व वर्षातून दोनदा प्रगतीचा अहवाल शिक्षण विभागास सादर करणे आदी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
महापालिकेकडून प्रशिक्षणाच्या आयोजनात सक्रीय सहभाग घेणे, संस्थेने दिलेल्या प्रशिक्षण दिनदर्शिककेप्रमाणे संबंधित शिक्षकांना, विषय तज्ज्ञ तसेच सुपरवायझर यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देणे, आयोजक संस्थेशी संपर्क ठेवून प्रगती आढावा घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व बैठका आयोजित करण्याबाबत सहकार्य केले जाईल, अशी माहिती महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली.