शिराळा – शिराळा पश्चिम भागातील चांदोली धरण, अभयारण्य 30, 31 डिसेंबर व एक जानेवारी या तीन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा चांदोली धरण व राष्ट्रीय उद्यान दोन जानेवारीपासून खुले करण्यात आले आहे. अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
चांदोली धरण 34.40 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण म्हणून गणले आहे. सध्या धरणात 31.59 टीएमसी पाणीसाठा असून धरणात 91.80 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरण पाहण्याची विनामूल्य पास वारणावती येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. बारमाही हिरवळीने नटलेला परिसर म्हणून चांदोली परिसराला ओळखले जाते.
धरण परिसरातील वारणा नदीच्या निसर्गरम्य सुंदर परिसर दाट झाडी नेहमीच पर्यटकांना भुरळ घालताना दिसत आहे. तर चांदोली धरणाच्या सन लाईट पॉईंट देखील पर्यटकांना पाहण्याजोगा आहे. चांदोली धरण व राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी सांगली सातारा व कोल्हापूर तसेच पुणे मुंबईतून पर्यटकांची मोठ्या प्रमाणात हजेरी लागत असते. सध्या या पर्यटन ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील विकास आणखी झाल्यास स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मच्छ बीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत असल्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होणार आहेत.