दिल्ली : मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मोठी कारवाई केली. (ED conducts raids at 25 locations in Delhi in liquor policy case) ईडीने राजधानी दिल्लीत जवळपास 25 ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी सोमवारी सीबीआयने अभिषेक बोईनपल्लीला अटक केली होती.
सीबीआयने दावा केला आहे की, अभिषेक बोईनपल्ली हा दक्षिण भारतातील काही मद्यविक्रेत्यांसाठी काम करत होता. रविवारी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास तो टाळत असल्याचं सीबीआयला आढळून आलं. त्यानंतर रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यांनी सांगितलं की या प्रकरणात ही दुसरी अटक आहे. यापूर्वी व्यापारी आणि आम आदमी पक्षाचे नेते विजय नायर यांना अटक करण्यात आली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही या प्रकरणात आरोपी आहेत.
त्याच वेळी, शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपानंतर टाकलेल्या छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे एक कोटी रुपये वसूल केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी दिल्ली-एनसीआर, पंजाब आणि तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये सुमारे 35 ठिकाणी छापे टाकण्यात आले. ज्यामध्ये दारू व्यापारी, वितरण कंपन्या आणि संलग्न युनिट्सवर छापे टाकून सुमारे एक कोटी रुपये जप्त करण्यात आले. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की, या कारवाईत एजन्सीने दिल्लीस्थित एका टीव्ही चॅनलचे संचालक, अल्कोहोलिक पेये आयात-निर्यात कंपनीचे मालक आणि पंजाबचे माजी आमदार यांच्या घरावर छापा टाकला. 14 ऑक्टोबरपर्यंतच्या कारवाईत केंद्रीय एजन्सीने या संदर्भात 103 ठिकाणी छापे टाकले असून गेल्या महिन्यात इंडोस्पिरिट या मद्य निर्मात्याचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंदूला अटक केली आहे.