पुणे – महाराष्ट्र संघाने 82 गुण संपादन करून 18 व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद जिंकले. कर्नाटक संघाला 55 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आयोजित केली होती.
या तीनदिवसीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी शेवटच्या दिवशी 11 पैकी 6 सुवर्णपदके आपल्या नावावर करून निर्विवाद वर्चस्व राखले. त्यांनी एकूण 9 सुवर्ण, 8 रजत व 5 ब्रॉंझपदके जिंकली.
या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या सायकलपटूंना कर्नाटकच्या सायकलपटूचे आव्हान होते. त्यांना 4 सुवर्णपदकांवर समाधान मानावे लागले. हिमाचल प्रदेश संघाने 1 सुवर्णपदक जिंकले.
शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या महिलांनी एलिट महिला क्रॉसकंट्री ऑलिम्पिक (30 कि. मी.) व सब-ज्युनियर क्रॉसकंट्री ऑलिम्पिक (15 कि. मी.) प्रकारात निर्विवाद वर्चस्व राखले.
महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी एलिट महिला (22 गुण) व सब-ज्युनियर (34 गुण) दोन प्रकारात वर्चस्व राखत जेतेपद, तर ज्युुनियर गटात (16 गुण) उपविजेतेपद जिंकले. महिला एलिट क्रॉसकंट्री ऑलिम्पिक प्रकारात (30 कि. मी.) तिन्ही क्रमांक महाराष्ट्रच्या महिलांनी जिंकले. प्रणिता सोमणने सुवर्ण (1 तास 29 मिनीट 26.944 से.), रुतिका गायकवाडने रौप्य (1 तास 32 मि.10.862 से.) तर प्रियांका कारंडेने (1 तास 38 मि. 43.014 से.) ब्रॉंझपदक जिंकले.
महाराष्ट्र संघाची व मूळची औरंगाबादची असलेल्या प्रणिता सोमनने दोन वैयक्तिक सुवर्ण व 1 मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकून उत्कृष्ट सायकलपटूचा किताब जिंकला. प्रणिताने गत कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत हा मान संपादन केला होता. दुसरीकडे कर्नाटकच्या चरिथगौडाने 2 वैयक्तिक व 1 मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून उत्कृष्ट सायकलपटूचा मान संपादन केला.