मुंबई- शिवसेनेने दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिले आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला. ‘देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका सुरू केला. मी त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे’, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला.
राणे म्हणाले, कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा संजय राऊत करत आहेत. त्यांना लिखाण करताना भान राहत नाही, रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील, असा हल्लाही नारायण राणे यांनी चढवला.
राणे पुढे म्हणाले की, भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. आता 56 आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आला आहात. नाही तर 8च्यावर गेला नसता. राजकीय निरीक्षकही त्यावेळी हाच आकडा सांगत होते. मोदींची मेहरबानी म्हणून 56चा आकडा आला. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं सांगतानाच मुख्यमंत्री काय बोलतात ते कळत नाही. असंही राणे म्हणाले.