काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणी खर्गे यांची चौकशी सुरू आहे. ईडीने खर्गे यांना समन्स बजावले होते. याप्रकरणी 2012 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात तक्रार दाखल केली होती. ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजतापासून खर्गे यांची चौकशी सुरु आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी यंग इंडियन लिमिटेड (YIL) द्वारे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणात काही काँग्रेस नेत्यांनी विश्वासघात आणि फसवणूक केली होती असा आरोप करण्यात आला होता. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. स्वामींनी या प्रकरणी सोनिया गांधी, मोतीलाल वोहरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांचा उल्लेख केला होता.
फेब्रुवारीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींकडून जवाब मागितली होता.गांधी कुटुंबाला नोटीस बजावून न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी AICC सरचिटणीस ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया (YI) यांना 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर त्यांची भूमिका मांडण्याची विनंती केली होती.
दरम्यान, ईडीने सोमवारी खर्गे यांना समन्स बजावले होते. त्यांना सकाळी 11 च्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात पोहचण्याचे सांगण्यात आले होते. सकाळी 11 वाजेपासून त्यांची ईडीच्या कार्यलयात चौकशी सुरू आहे.