पणजी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 761 खेळाडू आले. हरयाणाच्या खेळाडूंची संख्या त्यांच्यापेक्षा अधिक होती. पण तरीही महाराष्ट्राने अव्वल स्थान मिळवले, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कौतुक केले. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
“राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही वर्षभर मेहनत घेतली. काही जणांनी सवाल केला, हे आयोजन कशासाठी? आम्ही स्पर्धेचे यशस्वी शिवधनुष्य पेलले. यानिमित्ताने पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या, याचाच उपयोग आता गोव्याचे क्रीडापटू करतील,” असे सावंत यांनी सांगितले. उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 100 क्रीडा प्रकारांचा समावेश व्हायला हवा, अशी अपेक्षाही सावंत यांनी प्रकट केली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने गोव्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्याचा अतिशय आनंद होतो आहे, असे खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील क्रीडा प्रकार वाढवल्यामुळे क्रीडा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळाले, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी सांगितले. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन आणि राज्याची भूमिका आपल्या भाषणातून मांडली.
National Games 2023 : महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान…
दरम्यान, महाराष्ट्राने 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवला. महाराष्ट्राने तब्बल 80 सुवर्ण, 69 रजत, 79 ब्रॉंझ अशी एकूण विक्रमी 228 पदके मिळवली. सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त करत यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान संपादन केला.