पणजी : महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमधील अभियानाला पंजाब विरुद्ध सामन्याने स्पर्धेला प्रारंभ होईल. गोवा येथील मल्टिपर्पज क्रीडा संकुल येथे 3 नोव्हेंबरला हा उद्घाटन सामना होईल. याच दिवशी महाराष्ट्राच्या महिला संघाची बलाढ्य हिमाचल प्रदेशशी गाठ पडणार आहे. महाराष्ट्राच्या पुरुषांचा अ-गटात समावेश असून पंजाब, तमिळनाडू, चंडीगड या अन्य संघांचा या गटात समावेश आहे. महाराष्ट्राच्या महिलांचा ब-गटात समावेश असून राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा हे संघ या गटात आहेत.
3 नोव्हेंबर रोजी होणारे सामने
पुरुष : महाराष्ट्र वि. पंजाब : सायं. 5 वाजता
महिला : महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश : सायं. 6 वाजता
गटवार साखळी टप्प्यात महाराष्ट्राच्या पुरुषांना पेपर तसा सोपा वाटतो, तर महिलांचा प्रवास खडतर असेल. महिलांचा पहिलाच सामना राष्ट्रीय सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या हिमाचलशी होणार आहे. पण एकंदर महाराष्ट्राचा महिलांचा संघ समतोल आहे. संघनायिका हरजीत कौर संधू, सायली जाधव, पूजा शेलार, पौर्णिमा जेधे, अंकिता जगताप यांचा खेळ या सामन्यात कसा बहरतो व प्रशिक्षक राजेश पाडावे या सर्व खेळाडूंसह कशी रणनीती आखतात, यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.
पुरुषांच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा विशेष भरणा आहे. शंकर गदई, अस्लम इनामदार, आकाश शिंदे, मयूर कदम, अरकम शेख, आदित्य शिंदे, संघनायक किरण मगर आदी खेळाडूंच्या खेळावर महाराष्ट्राचे यशापयश अवलंबून आहे. गतवर्षी महाराष्ट्राचे सुवर्ण पदक थोडक्यात हुकले होते, यंदा ते मिळवायचे, या इराद्याने पुरुष संघ प्रशिक्षक दादासो आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार प्रयत्न करणार आहे.