पुणे – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. सध्या शहरात सगळीकडे निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळत असून, अनेक बडे राजकीय नेते आपल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले असल्याचं दिसून येत आहे.
नुकतंच, पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धांगेकर यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मात्र, या कार्यक्रमात एक गोंधळ पाहायला मिळाला. अजित पवार यांच्या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘अनाथांचा नाथ एकनाथ…’ हे गाणे वाजले अन् संपूर्ण कार्यकर्ते गडबडले.
झालं असं की, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सुरू असलेली प्रचाराची रॅली ही त्याच मार्गावरून गेली ज्या मार्गावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती.
परंतु अजित पवार यांची रॅली त्या कार्यक्रमास्थळी पोहोचतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आणि या घोषणाबाजीला प्रतिउत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘अनाथांचा नाथ एकनाथ…’ हे गाणं डीजे वर वाजायला सुरुवात केली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र चांगले संतप्त झाले. सध्या सगळीकडे या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.