narendra modi – डीपफेकचा उपयोग करत एकीकडे फ्रॉड केले जात आहेत तर दुसरीकडे बोगस व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या संदर्भात तयार करण्यात आलेले असे काही व्हिडिओ समोर आले आहेत व अशाच एका व्हिडिओत ते दांडीया खेळताना दिसून येत आहेत.
स्वत: मोदी यांना या व्हिडिओचा उल्लेख करत लोकांना सावधगिरीचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या दांडीया खेळतानाच्या व्हिडिओचे सत्यही समोर आले आहे. हा व्हिडिओ फेक नाही आणि यातील दांडीया खेळताना दिसणारी व्यक्ती पंतप्रधान मोदी नसून आपण स्वत: आहोत असा दावा विकास महंते (vikas mahante) नामक मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
त्यांचे मोदींसारखे (narendra modi) दिसणे हे या व्हिडिओचे भांडवल झाले होते आणि अनेक जणांनी हा व्हिडिओ शेअरही केला होता. मोदींनी मात्र त्या व्हिडिओचा उल्लेख करताना हा डीपफेकचा प्रताप असल्याचे म्हटले होते.
विकास महंते यांच्या म्हणण्यानुसार ते एक व्यावसायिक आणि कलाकार आहेत आणि त्यांना नेहमीच देशात आणि देशाबाहेरही अनेक कार्यक्रमांत आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमांत ते मोदी यांचे विचार मांडत असतात आणि तसा प्रयत्न करत असतात. हा व्हिडिओ नकली नाही, त्यातील व्यक्ती मीच आहे.
मोदींसारखे दिसणारे महंते हे मोदी यांच्यापेक्षा दहा वर्षे लहान आहेत, मात्र त्यांना अनेक ठिकाणी बोलावणे येत असते. मुंबईच्या मालाड येथे राहतात. मोदींशी झालेल्या भेटीबाबत ते म्हणाले की पंतप्रधानांनी मला डोक्यापासून पायापर्यंत चेक केले आणि त्यानंतर ते हसतच होते. महंते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, मात्र गेल्या काही काळापासून ते मुंबईत भाजपचा प्रचार करत आहेत.