हडपसर – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काम हे चार आण्यांसारखं आहे. त्यांनी मोजकंच बोलावं, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिलं जाईल. ईट का जवाब पत्थर से, असे म्हणत ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नारायण आज राणेंवर निशाणा साधला.
हडपसर हांडेवाडी रोडवरील आण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्राचे लोकार्पण मंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रभागातील नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरम्यान या प्रभागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानातील इतर कामाचे भूमिपूजन, रवी पार्क जवळील भुयारी मार्गात नाना भानगिरे यांच्या स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे असा विविध कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेविका प्राची आल्हाट, विधानसभा प्रमुख राजेंद्र बाबर, विधानसभा समन्वयक तानाजी लोणकर, उल्हास शेवाळे, शहर संघटक जान मोहमद शेख, शहर संघटिका विद्या होडे आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
“शिवसेना – भाजपचा युती धर्म भाजपने पाळला असता तर अडीच वर्षे ते सत्तेत राहिले असते, अडीच वर्षे आम्ही सत्तेत राहिलो असतो. ते आंब्याच्या झाडाखाली बसले असते आता ते बाभळीच्या झाडाखाली बसले आहेत,” अजून तीन वर्षे बाकी असतानाच भाजपनं आधीच यात्रा काढली आहे, अशी टीकाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केली.
गेल्या साडेचार वर्षात प्रभागात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून येथील विकास कामे केली आहेत. याशिवाय यापूढेही अधिक निधी वेळ प्रसंगी स्वखर्चाने येथील लोकहिताची कामे पूर्ण केली जातील. असे आश्वासन यावेळी नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिले.