मार्केट यार्डातील प्रकार : डाळींब यार्ड उभारणीसाठी हालचाली
पणन संचालकांनी यापूर्वीच दिले आहेत चौकशीचे आदेश
पुणे – मार्केट यार्डात प्रस्तावित अद्ययावत बाजार उभारणीसाठी ठेवलेल्या भूखंडावर पणन संचालकांचे चौकशीचे आदेश असतानही बांधकाम सुरू झाले आहे. डाळींब यार्डासाठी हे बांधकाम सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. फाउंडेशनचे सुमारे 11 कॉलम रातोरात उभारले आहेत. यासाठी पणन संचालक, महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. पणन संचालक पुण्यातच असतात. चौकशीच्या आदेशानंतरही येथे बांधकाम सुरू झाल्याने, ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या अनेक वर्षांपासून ठराविक आडत्यांना डाळींब विक्रीसाठी शेड दिले आहे. त्यानंतर इतर आडत्यांनीही अतिरिक्त आवकेच्या नावाखाली नवीन शेडचा हट्ट धरला. त्यानंतर प्रशासनाने सर्व नियम, परवानग्या डावलत ठराविक आडत्यांना भाडेकरार करून दिले. यासाठी कोट्यवधींच्या उलाढालीची चर्चा बाजारात आहे.
साधारण गेल्या महिनाभरापूर्वी आडत्यांनी डाळींब विक्रीला अतिरिक्त जागेची मागणी केल्यानंतर बाजार समितीने चार नंबर गेटलगत न्यायप्रविष्ट जागेत डाळींब यार्ड बांधण्यासाठी जागा वाटप आणि भाडेकरार केले. मात्र, प्रसारमाध्यमांनी हा बेकायदा डाळींब यार्डचा प्रकार बातम्यांच्या माध्यमातून उघडकीस आणला.
त्यानंतरच समितीने गुलटेकडी मार्केटयार्ड मुख्य प्रवेशद्वार समोरील ट्रकच्या पार्किंगच्या स.न.559 अ/2 ब/2 1 हेक्टर 34 आर म्हणजे सुमारे तीन ते सव्वा तीन एकर मोक्याची जागा आडत्यांच्या घशात घालण्यासाठी भाडेकराराने देऊन टाकली आहे. यावर पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पुढील प्रक्रिया थांबविणे आवश्यक असताना या भुखंडावर बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे पणन संचालक यावर काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्या जागेवर डाळींब यार्डाचे काम सुरू नाही. तर, लाइट व्यवस्थेचे काम सुरू असल्याचे सांगितले.