विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा
भंडारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात तपासणी होणे आवश्यक असून गाव पातळीवर तपासणी केल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती लक्षात येऊन उपचाराची दिशा ठरविण्यास मद होईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
याकरिता राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजच्या स्टाफ व प्रशिक्षणार्थी यांची टीम तयार करून तपासणी करावी असे मुख्यमंत्र्यांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ग्रामीण पातळीवर तपासणी केल्यास कोरोनाचे रुग्ण जलदगतीने लक्षात येतील व उपचाराची दिशा ठरविणे सोपे होईल असे ते म्हणाले.
नागपूरमध्ये ४, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया या ठिकाणी मेडिकल प्रत्येकी एक मेडिकल कॉलेज आहेत. याचा फायदा चाचपणी करण्याकरिता होईल असे मत सुद्धा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. नाना पटोले भंडारा येथे कोरोना प्रादुर्भावापासून बचावाचा आढावा घेण्याकरिता आले होते. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा सुद्धा आढावा घेतला. याप्रसंगी त्यांचेसोबत आमदार राजू कारेमोरे, आ. नरेंद्र भोंडेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे उपस्थित होते.