कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

नवी दिल्ली,19 : एकीकडे कॉंग्रेस संघटनात्मक पातळीवर संघर्ष करीत असताना दुसरीकडे पक्ष मजबूत करण्यासाठी विविध फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. यातच महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

मात्र विजय वडेट्टीवार आणि राजीव सातव यांची नावे देखील प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. तर विजय वडेट्टीवार यांच्यासाठी स्वतः अशोक चव्हाण यांनी हायकमांडकडे शब्द टाकल्याची देखील राजधानीत चर्चा आहे.

दोन आठवड्यांपासून कॉंग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येते. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्‍चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. नाना पटोले यांच्या रुपाने कॉंग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. 

कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्‍यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही कॉंग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.