‘मी मोदींना घाबरत नाही, मला कोणीही हात लावू शकत नाही’

नवी दिल्ली – आपण स्वत: स्वच्छ आहोत, त्यामुळे आपण मोदी असो किंवा अन्य कोणालाही घाबरत नाही असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले आहे. आज दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या संबंधात झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की ते मला हात लावू शकत नाहीत.

ते मला गोळ्या घालू शकतात पण माझ्यावर कोणती कारवाई करू शकत नाहीत. मी देशभक्त असून माझ्या देशाचे रक्षण करणे हेच माझे काम आहे आणि हेच काम मी करीत आलो आहे आणि यापुढेही करणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. देशहिताच्या बाबतीत मी त्यांच्यापेक्षा अधिक सणकी आहे असेही त्यांनी यावेळी गमतीने नमूद केले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्यासाठीच तीन वादग्रस्त कृषी कायदे आणले असून त्यामुळेच शेतकरी भडकले आहेत. त्यांनी या संबंधात जे आंदोलन सुरू केले आहे, त्यावर हे कायदे रद्द करणे हाच एकमेव उपाय आहे असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी देशातील शेतकऱ्यांची स्थिती कथन करणारी एक पुस्तिकाही प्रकाशित केली.

ते म्हणाले की हे कायदे जर संमत झाले तर देशातील सारे कृषी क्षेत्र हे केवळ तीन ते चार उद्योगपतींच्या हातात जाईल. यातून शेतकरी कायमचा उद्धवस्त होईल. त्यामुळेच शेतकऱ्यांनी दिल्लीत हे आंदोलन केले असून त्या आंदोलनाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे. देशातील सर्वांनीच या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक गाव वसवले आहे त्या सबंधात कॉंग्रेसने केलेल्या टीकेवर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी कॉंग्रेसवरच टिका करणारी प्रतिक्रीया दिली आहे त्यावर राहुल गांधी यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले की हे नड्डा कोण आहेत? आणि त्यांच्या प्रश्‍नाला मी का उत्तर देऊ? असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.