मुंबई – अभिनेता सनी देओलचा आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा ‘गदर’ या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर आता या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. ‘गदर-2’ चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांचा आवाज प्रेक्षकांना ऐकता येणार असल्याची माहिती तरण आदर्शन यांनी दिली आहे.
तरण आदर्शन यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘नाना पाटेकर हे ‘गदर 2′ या चित्रपटासाठी व्हॉइस ओवर करत आहेत. नानांचा व्हॉइसओव्हर गदर-2 या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकांना ऐकू येणार आहे. 2001 मध्ये गदर चित्रपटाच्या इंट्रोडक्शनच्या सीनसाठी ओमपुरी यांनी व्हॉईस ओव्हर केला होता.’ या माहितीनंतर आता नाना पाटेकर यांचे चाहते आनंदी झाले आहेत.
नाना पाटेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेलकम बॅक, तिरंगा, शक्ती, अंगार या हिंदी चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय नटसम्राट, डॉ प्रकाश बाबा आमटे या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम काम करत प्रेक्षकाची मनं जिंकली आहेत.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2’ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होऊन जवळपास 17 वर्षांनंतर निर्माते ‘गदर 2’ लोकांसमोर आणत आहेत. ‘गदर 2′ चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील दिसणार आहे, जो ‘गदर: एक प्रेम कथा’ मध्ये बालकलाकार होता. मात्र ‘गदर 2’ मध्ये तो आता नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.