दैनिक “प्रभात’ने आवाज उठवताच स्वयंसेवी संस्थेची मागणी
पुणे – महापालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या वैद्यकीय योजनेतील लाभार्थ्यांची नावे जाहीर करा अशी मागणी, सुराज्य संघर्ष समिती या स्वयंसेवी संस्थेच्या विजय कुंभार यांनी केली आहे.
महापालिकेने या योजनेसाठी नऊ महिन्यात सुमारे 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. 30 हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला. याविषयीचे वृत्त 8 जानेवारी रोजी दै. प्रभात’ ने प्रसिद्ध केले आहे. त्याविषयी कुंभार यांनी प्रतिक्रिया दिली असून, लाभार्थ्यांची यादीच महापालिकेने प्रसिद्ध केली नसल्याचे कुंभार यांचे म्हणणे आहे.
पुणे महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटक आणि महापालिकेचे कर्मचारी पदाधिकारी यांच्यासाठी महापालिकेमार्फत काही वैद्यकीय योजना राबवल्या जातात. माहिती अधिकार अधिनियमातील कलम 4 नुसार सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक असते. महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहिले असता अशी कोणतीही यादी महापालिकेने प्रसिद्ध केल्याचे आढळून आले नाही, असे कुंभार म्हणाले. महापालिकेने राबवलेल्या स्वत:च्या तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय योजनांच्या लाभार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच ही यादी सतत अद्ययावत करावी.
लाभार्थ्याच्या आजाराची माहिती प्रसिद्ध करणे कायद्याने शक्य नाही त्यामुळे किमान मागील 5 वर्षातील फक्त लाभार्थ्यांची यादी, त्याची पात्रता आणि देण्यात आलेल्या लाभाची माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे.