18 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच “पिफ’ दि. 9 ते 16 जानेवारीदरम्यान पार पडतोय त्यानिमित्ताने…
– अमोल कचरे
पुण्यातील आर डेक्कन चित्रपट गृहात सुरू असलेला चित्रपट पाहून जवळजवळ प्रत्येक सीनला सर्वच प्रेक्षक लोटपोट हसत आहेत. चित्रपटातील गाणी सुरू झाल्यावर प्रेक्षक स्क्रीनसमोर येऊन बेभान होऊन नाचत आहेत. तुम्ही म्हणाल की, “सैराट’ या चित्रपटावेळी प्रेक्षक असेच नाचले होते. पण हे त्यापूर्वी घडलं होतं. 2012 सालच्या पिफमध्ये सचिन पिळगावकर यांना चित्रपटसृष्टीत 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानिमित्ताने पिळगावकर यांचे काही चित्रपट “पिफ’मध्ये दाखवले होते. यापैकी “अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. आर-डेक्कनमध्ये ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट त्या दिवशी पाहिला त्यांच्या हे सगळं कायम लक्षात राहणार हे निश्चित. “पिफ’बद्दलच्या या आणि अशा बऱ्याच अविस्मरणीय आठवणी पुणेकरांनी जपल्या आहेत.
ही आठवण आताच सांगायचं कारण म्हणजे आठवडा भर दर्जेदार अशा जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) गुरुवारपासून (दि.9) सुरू होत आहे. यंदा “पिफ’चे 18 वे वर्ष आहे. 2020 मधील नव्या दशकातील “पिफ’ नवीन ठिकाणांसह पुणेकरांच्या भेटीला येणार आहे. यंदा काही तांत्रिक अडचणींमुळे “सिटी प्राइड’ कोथरुड येथे “पिफ’ होणार नसून सेनापती बापट रोडवरील पीव्हीआर, बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या ठिकाणी पिफचे स्क्रीनिंग होणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 14 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. गुरुवारी उद्घाटनानंतर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रोड) आणि फेज 2 कोथरुड येथे रात्री 8 वाजता “द विझेल्स टेल’ हा जुआन होजे कॅंपानेला दिग्दर्शित अर्जेंटिना देशातील चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यंदाचा “पिफ’ काय काय सरप्राइज घेऊन येतोय, याचीच उत्सुकता सर्वांमध्ये आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांची मेजवानी
“महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्ष’ ही या वर्षीच्या महोत्सवाची थीम असून यांतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित “छत्रपती शिवाजी’, राजा परांजपे दिग्दर्शित “जगाच्या पाठीवर’, व्ही शांताराम दिग्दर्शित “कुंकू’, अनंत माने दिग्दर्शित “सांगते ऐका’, गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित “सोंगाड्या’ हे चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे, हे निश्चित.