पिंपरी – सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके हे मुंगेरीलाल के हसीन सपने पहात आहेत. ते फक्त दावा करू शकतात. यंदाच्या महापालिका निवडणुकीत ते स्वतः निवडून येतात का ते बघावे लागेल, अशी टीका माजी महापौर योगेश बहल यांनी केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 14 व शिवसेनेचेही काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. याबाबत सोमवारी (दि. 20)विरोधी पक्षनेता कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत योगेश बहल यांना विचारले असता त्यांनी ढाके यांचा चांगलाच समाचार घेतला.
बहल म्हणाले, सत्तारुढ पक्षनेते आमदारांच्या तालावर नाचत आहे. सत्तारुढ पक्षनेत्यांना वास्तविकता काय आहे हे माहित नसते. ते फक्त स्वप्न पाहण्यात व्यस्त असतात. यंदा शंभर प्लसचे त्यांनी स्वप्न बघू नये. मागच्या वेळी मोदी लाटेच्या जीवावर त्यांचे नगरसेवक निवडून आले. त्या लाटेत पावन झालेली ही मंडळी आहेत. या पावन मंडळींना जनता नाकारणार आहे.
नागरिकांना तर माहितच नाहीत भाजपचे कोण नगरसेवक आहेत. तर भाजपच्या शहराध्यक्षांना देखील माहिती नव्हते की आपले नगरसेवक कोण कोण आहेत. अनेक नगरसेविकांना त्यांच्या समोर गेल्यावर सांगावे लागत होते की आम्ही नगरसेविका आहोत. हे सर्व लाटेत निवडून आलेले आहेत.
त्यावेळी आमच्याबाबत काही लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा अप्रपचार झाला. तो देखील खोटा आरोप होता सिद्ध झाले आहे. मात्र, आता सत्ताधारी भाजपच्या काळात कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार सुरू आहेत. कोणताही विषय असला तर तो कोटीच्या वर आहे. फक्त त्यावेळेस डंका जास्त वाजवला गेला. आता आमची वेळ आली असल्याचेही बहल म्हणाले.