मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे हे सध्या आपल्या आगामी घर बंदूक बिर्याणी या आगळ्यावेगळ्या चित्रपटनामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नागराज यांचा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशात नागराज मंजुळे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याची घोषणा नागराज मंजुळे यांनी केली आहे.
थेट कोल्हापूरमधून कुस्तीच्या मैदानातून मंजुळे यांनी ही घोषणा केल्याचे समोर आले आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते त्यांची मेहनत आणि कष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. भारतातीलच नाही तर देशभरातील कुस्तीपटूंसाठी खाशाबा जाधव हे एक प्रेरणास्थान आहे त्यामुळे आता या चित्रपटाबाबतची आतुरता कुस्तीप्रेमींना लागली आहे.
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये नागराज मंजुळे यांनी कुस्त्या पाहण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी नागराज यांनी ही मोठी घोषणा केली. “खाशाबा जाधव हे जागतिक कीर्तीचे पैलवान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे,लवकरच या संदर्भातील माहिती येईल” अशी घोषणा यावेळी नागराज मंजुळे यांनी केली.
घर बंदूक बिर्याणी येतोय
‘घर बंदूक बिर्याणीचा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता लागली होती. त्यातच चित्रपटातील भन्नाट गाण्यांमुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. ‘घर बंदूक बिरयाणी’ हा चित्रपट 7 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.