मुंबई – अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. सध्या नागराज आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्रात चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. अशात नागराज मंजुळेने चंद्रपूर पोलिसांची भेट घेतल्याचे समजते.
‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधला. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले.
या चित्रपटात नागराज यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे.’घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या आत एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांच्या व्यतिरिक्त आकाश ठोसर, सायली पाटील अशी स्टार कास्ट आहे.
नागराज मंजुळे यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच चांगले आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांच्या चित्रपटांचे कौतुक झाले आहे. एक दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे किती प्रतिभावान आहेत, हे आपल्याला माहितच आहे. यापूर्वी आपण त्यांचा अभिनयही पाहिला आहे.त्यामुळेच आता या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.