पाथर्डी – पोलीस दलातील पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप करत येत्या दोन दिवसांत पदोन्नतीची यादी न बदलल्यास अज्ञातस्थळी आत्महत्या करेल, अशी धमकी येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल रामनाथ भाबड यांनी एका पत्रातून दिल्याने खळबळ उडाली आहे.
भाबड हे पोलीस दलात कार्यरत असून येत्या एक महिन्यात सेवानिवृत्त होत असून आजपर्यंत केलेल्या सेवेमुळे आपल्या सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पदोन्नत्तीची यादी जाहीर होऊनही त्यांना पदोन्नती न मिळाल्याने ते नाराज झाले.
त्यांनी पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस प्रमुखांना पत्र लिहित दोन दिवसात पदोन्नत्तीची यादी न बदलल्यास अज्ञातस्थळी आत्महत्या करेल, अशी धमकी त्यांनी एका पत्रातून दिली. भाबड यांनी दिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
सध्या भाबड हे येथील पोलीस स्टेशनला गार्डची ड्युटी करत असून निवृत्त होण्यास अवघा एका महिना बाकी असतानाही पदोन्नती न मिळाल्याने ते सध्या निराश आहेत. त्यांच्या पत्राची चर्चा होताच भाबड यांना नगर येथील पोलीस मुख्यालयात बोलावून घेत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.