कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माणुसकी धर्म जपत एका अपघातग्रस्त जखमी युवकास तातडीने स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले. कोल्हे हे अक्षरशः देवदूतासारखे त्या जखमी तरुणाच्या मदतीला धावून आल्याने त्याला जीवदान मिळाले.
युवा नेते विवेक कोल्हे बुधवारी (दि.१३ डिसेंबर) रात्री आपल्या गाडीतून जात होते. त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील धामोरी फाटा येथील साईबाबा मंदिरासमोर एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतः गाडीतून उतरून त्या तरुणाकडे धाव घेतली. तरुण मदतीच्या प्रतीक्षेत बराच वेळापासून रस्त्यावर पडलेला होता. या रस्त्यावरून अनेक वाहने जात होती; परंतु कोणीही त्या तरुणाच्या मदतीसाठी थांबत नव्हते. अशा वेळी कोल्हे यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण केले.
एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या गाडीतून त्या जखमी तरुणाला उपचारासाठी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमी युवकाला कोल्हे यांनी तत्काळ स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.
त्यानंतर कोल्हे यांनी स्वतः चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या जखमी युवकाची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. विवेक कोल्हे हे नेहमीच अडचणीत व संकटात सापडलेल्या नागरिकांना तत्परतेने मदत करत असतात. यापूर्वी त्यांनी अनेक अपघातग्रस्त नागरिकांना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले आहेत.