नगर (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात घरफोडी करणारा आरोपी पुणे जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. पुढील तपासाकामी त्याला मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोमनाथ गणेश मिसाळ (वय ३१, रा. उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत हकिगत अशी की, दिनांक मंगळवार (दि.२९) एप्रिल रोजी फिर्यादी नाना चंद्रभान पवार (वय ६०, रा. नागलवाडी, ता. कर्जत) यांचे बंद घराचे कुलूप तोडुन घरातील ४ लाख ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच ठसे तज्ज्ञ यांच्या विश्लेशनातून हा गुन्हा सोमनाथ मिसाळ याने केला असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच आरोपी हा पुणे जिल्ह्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने उरूळीकांचन येथून आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार विशाल दळवी, रवींद्र कर्डिले, सागर ससाणे, अमृत आढाव, संतोष खैरे, विजय ठोंबरे व भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.