नगर, (प्रतिनिधी) – खासगी क्लासवरून घरी जाणाऱ्या तरूणीची छेड काढण्यात आली. नगर तालुक्यातील टाकळी ते खातगाव या रस्त्यावर गुरूवारी (दि.२) रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जगदिश रावसाहेब कदम ( हल्ली रा. हिवरे बाजार, ता. नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरूणी ही अहमदनगर येथील खासगी क्लास झाल्यावर एस. टी. बसने टाकळी खातगाव येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उतरली. टाकळीवरून खातगाव रस्त्याने एकटी पायी घरी जात होती. त्यावेळेस दुचाकीवरून आलेल्या तरूणाने तिची छेड काढली.
तिने प्रतिकार केला असता, त्याने मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडा-ओरड केल्यावर रस्त्याने जाणारे लोक मदतीसाठी आली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी जगदिश कदम याच्याविरूद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.