४५ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
पाथर्डी – संस्थेच्या नावाने लघु उद्योगासाठी घेतलेली जमीन अकृषक करून व बनावट लेआउट करत त्याची परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी तालुक्यातील खरवंडी कासार येथील भगवानगड औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सभासद अशा मिळून एकूण ४५ जणांविरोधात सहकार विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सहकार खात्याचे उपलेखापरीक्षक महेंद्र तुळशीराम घोडके यांनी फिर्याद दिली. भगवानगड औद्योगिक संस्थेची स्थापना १९९२ साली झाली होती. या संस्थेने खरवंडी कासार परिसरात संस्थेला लघुउद्योग करण्यासाठी कायम खरेदीने शेतजमीन विकत घेतली होती. लघुद्योग करण्यासाठी ही जमीन अकृषक करून मिळावी, असा प्रस्ताव ९४ साली संस्थेचे तत्कालीन चेअरमन लिंबाजी नाना खेडकर यांनी महसूल प्रशासनाकडे दाखल केला.
हा प्रस्ताव दाखल केल्या नंतर महसूल प्रशासनाने ही ८७. ५० हेक्टर जमीन बिनशेती करण्यास परवानगी सुद्धा दिली. मात्र ही परवानगी मिळाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी, संचालक व काही सभासदांनी मिळून संस्थेच्या २४ सभासदांकरीता २४ व संस्थेसाठी एक असे एकूण २५ प्लॉट पाडले. त्याचा बनावट ले आऊट करून इतरांना स्वतःच्या फायद्यासाठी विकले. हे करताना संस्थेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत संस्थेची फसवणूक केली. संस्थेच्या या व्यवहारा संदर्भात काही सभासदांनी तक्रारी केल्यानंतर संस्थेच्या नावाने घेतलेली जमीन संचालक मंडळ, सभासद यांनी स्वतःच्या नावाने करत संस्थेची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्यामध्ये संस्थेचेे सभासद लिंबाजी नाना खेडकर, विष्णु किसन खेडकर, शिवाजी दशरथ जाधव, लक्ष्मण पांडुरंग गायकवाड , गोरक्ष ज्ञानोबा खेडकर, भिमराव ज्ञानोबा खेडकर, बाबासाहेब महादेव घोडके, महादेव भिमराव खेडकर, दत्तविजय सोमनाथ शेटे, रिकबचंद भागचंद कटारिया, हिरालाल माणकचंद बोथरा, मुकुंद चंद्रकांत चिंतामण, प्रल्हाद किसन जोशी, मुरलीधर किसन जोशी, बाळासाहेब लक्ष्मण लोंदे, प्रकाश कन्हैय्यालाल कटारिया, नवनाथ भगवान दहिवा, मंदा नाथा ढाकणे, राजेंद्र भिवाजी खाडे, लक्ष्मण रामभाऊ गोल्हार, बन्सी बाजीराव खेडकर ,
ज्ञानदेव बाबुराव दराडे, गौतम भगवानदास छाजेड , अनिल बद्रीनारायण शर्मा तसेच संचालक चंद्रकांत भागचंद कटारिया, बाबु दिनकर बोरुडे, तबाजी घमाजी खेडक, भगवान काशिनाथ खेडकर, ज्ञानदेव नामदेव खामकर, शोभा जवाहर कटारिया, देविदास लिंबाजी खेडकर, जगन्नाथ माधवराव गुळवे, मंगल दिनकर खेडकर, बाबासाहेब भानुदास सुर्यवंशी, दिनकर नाना खेडकर, बप्पाजी नाथा सुपेकर, दत्तविजय सोमनाथ शेटे, संदीप पाराजी कराड, सतिश भानुदास जाधव, उज्वला गणेश खेडकर, निलेश तुकाराम अंदुरे , सचिव गेणासाहेब भानुदास खेडकर, नारायण यादव भापकर, गणेश बापुराव खेडकर, बप्पाजी नाथा सुपेकर यांचा समावेश आहे.