नगर, (प्रतिनिधी) – हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील ३ एकर २९ गुंठे नगर मनमाड रोड लगत असणारी जमीन संगनमताने, कटकारस्थान रचत अवघ्या २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव करण्यात आला. याची सरकारी किंमत ३२ कोटी व बाजार भाव ४०० कोटी रुपये असताना जाणीवपूर्वक फक्त २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत ठराव घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी वसंत हस्तिमल लोढा (रा.आनंदीबाजार, नगर), दीप नारायण चव्हाण (रा. सिद्धार्थनगर, नगर), संजय विठ्ठलराव घुले (रा.माळीवाडा, नगर) यांनी संस्थेचे विश्वस्त अजित सिमरतमल बोरा, अनंत रामचंद्र फडणीस, शिरीष दामोदर मोडक, संजय जोशी व इतर विश्वस्थांविरोधात फिर्याद दिली. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही हिंद सेवा मंडळाचे आजिव सभासद आहोत. हिंद सेवा मंडळाने १४ नोव्हेंबर १९६४ रोजी सावेडी येथील सनं १६१ -१ ही ९९ वर्ष भाडेपट्टाने सय्यद हाजी हमीद ताकीया सावेडी ही देवस्थानची मिळकत ५०० रुपये प्रती वर्षाने शैक्षणिक कारणासाठी घेतली होती.
याचा भाडेपट्टा ४० वर्ष अजून शिल्लक आहे, असे असतानाही हिंद सेवा मंडळाचा विश्वस्त अजित सिमरतमल बोरा याने स्वतःच्या फायदयासाठी इतर काही विश्वस्थांना आर्थिक प्रलोभन देत संस्थेचे नुकसान करत ही जागा तिराहित इसमांना २५ कोटी रुपयात देण्यासाठी तयार करत ठराव केला असे यावेळी म्हटले आहे.
पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
अजित सिमरतमल बोरा याने खरेदीखत दस्तवर याने साक्षीदार म्हणून सही केली आहे. तो फर्म लुणीया मुनोत आणि कंपनी, १०१ राहुल अपार्टमेंट, नगर पार्टनर रसिकलाल झुंबरलाल लुणीया याचा भागीदार आहे.
ही बाब लपवून सध्या तो हिंद सेवा मंडळाचा मागील १५ वर्षांपासून विश्वस्थ आहे. ही मिळकत देवस्थान इनाम वर्ग ३ असून, अशी मिळकत राज्य शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय हस्तांतर करता येत नाही, असे असतानाही पदाचा गैरवापर करून ही मिळकत हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.