पिंपरी – कंपनीतून खाद्य तेलाचे भरलेले डबे घेऊन निघालेल्या ट्रक चालकाने एक लाख 68 हजार रुपये किंमतीचे 112 डबे मालकाच्या परस्पर विकून त्याचा अपहार केला. याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 ते 17 जुलै दरम्यान भोसरी परिसरात घडला.
मनोजकुमार काकासाहेब शिंदे (वय 34, रा. भेकराईनगर, हडपसर) यांनी शनिवारी (दि. 6) याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश प्रकाश राजोळे (वय 25, रा. लक्ष्मीनगर, दिघी. मूळ रा. पिरुपटेल वाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे आणि आरोपी राजोळे हे दोघेही चालक आहेत. शिंदे यांना खोपोली मधील तेलाच्या कंपनीमधून तेलाचे डबे वाहतूक करण्याची ऑर्डर मिळाली. खोपोली येथील फ्रीगोरिफीको अलाना प्रा. लि. या कंपनीमधून 20 टन वजनाचे तेलाचे डबे शिंदे यांनी आरोपी राजोळे याच्या ट्रकमध्ये भरून दिले.
भोसरी परिसरात आरोपीने एक लाख 68 हजार रुपये किमतीचे 1 हजार 680 किलो वजनाचे 112 तेलाचे डबे परस्पर चोरी करून विकले. याबाबत 5 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, भोसरी पोलीस तपास करीत आहेत.