अबुधाबी – संयुक्त अरब अमिरातीमध्ये दोन दिवसीय जागतिक मुस्लिम समुदाय परिषदेत अनेक देशांतील मुस्लिम धर्मिय नेत्यांनी भाग घेतला. या परिषदेतेतील इजिप्तच्या मंत्र्याचे भाषण जगभर चर्चेचा विषय बनले आहे. मुस्लिम समाजाने आपला देश, ध्वज आणि मातीशी प्रामाणिक असले पाहिजे, असे इजिप्तचे मंत्री म्हणाले. या परिषदेत यूएई, रशिया, तुर्की, सीरिया, अझरबैजान आणि इजिप्तमधील मुस्लिम नेते सहभागी झाले होते. 8 आणि 9 मे रोजी अबुधाबी येथे ही परिषद झाली.
वृत्तानुसार, इजिप्तचे मंत्री डॉ. मोहम्मद मुख्तार गोमा यांनी इस्लामिक एकतेवर आपले भाषण दिले. ते म्हणाले की, मुस्लीम समाज तर्कशुद्ध मार्गानेच एकत्र येऊ शकतो. याशिवाय दुसरा मार्ग पूर्णपणे अशक्य आणि काल्पनिक आहे. जगातील बहुतांश अतिरेकी आणि दहशतवादी संघटना दुसरी पद्धत वापरत आहेत. ते मुस्लिमांना एक देश आणि एका झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत जे व्यर्थ आहे. वेगळा देश निर्माण करण्याची कल्पना देशांना कमकुवत करते आणि मुस्लिम अल्पसंख्याकांना एकटे पाडते.
परिषदेत यूएईचे मंत्री शेख नह्यान बिन मुबारक म्हणाले की, मुस्लीम समाजाने विज्ञानाच्या आधारे एकत्र आले पाहिजे. विज्ञान आणि संशोधन हा इस्लामी ऐक्याचा आधार असला पाहिजे. ते म्हणाले की, आपला देश (UAE) सहिष्णुता आणि विकासाचे एक उत्तम उदाहरण आहे. एकजूट राहण्यासाठी आपली आव्हाने समजून घेतली पाहिजेत. मेरीलँड विद्यापीठाच्या 2016 च्या अभ्यासानुसार, गेल्या दशकात झालेल्या 70767 दहशतवादी हल्ल्यांपैकी 85 टक्के ISIS आणि अल-कायदा गटांनी केले. हे हल्ले मुस्लिमबहुल देशांमध्ये करण्यात आले, ज्यांचे मुख्य बळी मुस्लिम होते.