नवी दिल्ली – हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी हमासच्या नेतृत्वाबरोबर वाटाघाटी करायला इस्रायलचे शिष्टमंडळ इजिप्त आणि कतारला जाणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी नुकतीच या शिष्टमंडळाच्या भेटीला अनुमती दिली आहे. नेतान्याहू यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.
नेतान्याहू यांनी मोसादचे संचालक आणि इस्रायलची सुरक्षा एजन्सी आयएसए यांच्या संचालकांशी चर्चा केली असून वाटाघाटीसाठी पुढील चर्चेला मान्यता दिली आहे. ही चर्चा आगामी काही दिवसात दोहा आणि कैरो येथे होणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
ओलिसांची सुटका आणि युद्धबंदीच्या अप्रत्यक्ष चर्चेसाठी मोसाद आणि आयएसएचे प्रतिनिधी दोहा येथे गेले होते. मात्र तेथील चर्चेत कोणताही निष्कर्ष निघू शकला नव्हता. इस्रायलच्या प्रतिनिधींनी इजिप्त आणि कतारच्या प्रतिनिधींशी केलेली ही चर्चा निष्फळ ठरली होती. पूर्ण युद्धबंदीचा प्रस्ताव इस्रायलने नाकारल्यावर हमासनेही ओलिसांच्या सुटकेचा प्रस्ताव नाकारल्याने ही चर्चा अयशस्वी झाली होती. त्यानंतर इस्रायलने आपल्या प्रतिनिधींना माघारी बोलावले होते.
आता आंतरराष्ट्रीय मध्यस्थांसमवेत थेट हमासच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.