पाच ते सहा हल्लेखोरांनी धारधार हत्याराने केला हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
पुणे – पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारधार हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक विजय मारटकर (36) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते. ही घटना शुक्रवारी पहाटे एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली.
पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर धारधार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मारटकरयांना उपचारासाठी केम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता, पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही .
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर खूनी हल्ला केला. यामधे ते गंभीर जखमी झाले. दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोके पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटारसायकल वरून पसार झाल्याचे समजते. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. तसेच मोटारसायकलवर नंबर प्लेटही नव्हती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढला जातो आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.