शिरूर -पुणे जिल्ह्यात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 52 हॉस्पिटलचे प्रस्ताव प्रलंबित असून, हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.
शिरूर येथे आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सभापती मोनिका हरगुडे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते. पाबळ येथे 40 ऑक्सीजन बेडचे करोना उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत.