बारामती (प्रतिनिधी)- बारामती तालुका पुन्हा कोयता गँगच्या हल्ल्याने हादरला. इथे कोयता सराईत गुंडांनी नाही, तर मिसरूडं न फुटलेल्या अल्पवयीन मुलांनी चालवला आणि कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाचा निर्घृण खून केला. सुपे पोलिसांनी पाचही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून या घटनेमागील कारणांचा शोध सुपे पोलीस घेत आहेत.
काही दिवसांपूर्वीच बारामतीत चायनीज खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी आलेल्या अनिकेत धोत्रे या युवकावर काठी, लोखंडी रॉडने सहा जणांनी हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यास काही दिवस उलटत नाहीत.
तोच आता उंडवडी सुपे परिसरात ही घटना घडली आहे. आजच्या घटनेत कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकाचा चार ते पाच जणांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच चार ते पाच जणांनी कोयता व कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. गावातील एका कार्यक्रमावेळी झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. यात आणखीही काही कारणे असावीत, असे सांगितले जात आहे. दरम्यान, परिसरात तणावाचे वातावरण आहे. पुढील तपास सुपे पोलिसांकडून सुरू आहे.