सातारा (प्रतिनिधी) – अंडी उधार न दिल्याच्या रागातून यशवतेश्वर-कास रस्त्यावर पॉवर हाऊसजवळ बबन हणमंत गोखले (वय 42, रा. मंगळवार पेठ, सातारा) या दुकानदाराचा शुक्रवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास दोघांनी निर्घृण खून केला.
गेल्या चार दिवसांमध्ये शहरात खुनाची दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी शुभम कदम (वय 20) व सचिन माळवे (वय 20) या युवकांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यवतेश्वर-कास रस्त्यावरील पॉवर हाऊसजवळ बबन गोखले यांची टपरी असून ते किराणा माल विकत होते. शुभम कदम व सचिन माळवे यांनी काल (दि. 18) रात्री दुकानात जाऊन उधारीवर अंडी मागितली; परंतु गोखले यांनी त्यास नकार दिला. त्यावेळी गोखले व या युवकांमध्ये बाचाबची झाली होती.
त्यानंतर गोखले हे रात्री दहाच्या सुमारास घरी गेले. ते जेवायला बसणार इतक्यात शुभमने त्यांना फोन करून दुकानाचे कुलूप उघडे असल्याचे सांगितले. त्यामुळे गोखले हे शेजाऱ्याची दुचाकी घेऊन दुकानाकडे गेले. तेव्हा, संशयित युवकही दुकानाजवळ आले. त्यांनी गोखले यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दगड आणि धारदार शस्त्राने गोखले यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात गोखले हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यावरर दोघांनी पलायन केले. हा प्रकार काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि बबन गोखले यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले.
गोखले यांच्याशी दोन युवक वाद घालत असताना एका व्यक्तीने पाहिले होते. त्या व्यक्तीने संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी शुभम व सचिन यांना त्यांच्या घरांमधून ताब्यात घेतले.
दरम्यान, पॉवर हाऊसपासून काही अंतरावर दोन दिवसांपूर्वी बजरंग गावडे (वय 40, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा खून झाला होता. त्यानंतर याच परिसरात दुसरा खून झाल्याने तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.