लोणंद – उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव वर्मी बसल्यामुळे खंडाळा तालुक्यातील भादे येथील दगडेवस्ती या ठिकाणी उमेश पुरंदर काळे (वय २८) याचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर एका महिलेसह चौघेजण फरारी झाले आहेत.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भादे येथील दगडे वस्ती, होडी याठिकाणी उमेश काळे कुटुंबीयांसमवेत राहतो. काल रविवारी सायंकाळी उमेश ह कुटुंबीयांसमवेत घरासमोर बसला असताना त्याठिकाणी घरासमोर मैनेश मुकेश भोसले व इतर हे झाडाची कुऱ्हाडीने साल काढीत बसले होते. यावेळी उमेश काळे याने मैनेश भोसले याला माझ्या मोटारसायकलचा हप्ता थकीत असल्याचे सांगत उसने घेतलेले पैसे मागितले. यावेळी या दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. बाचाबाची सोडविण्यासाठी आलेल्या उमेशच्या पत्नीला मैनेश याने शिवीगाळ करत कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उमेशने हीच कुऱ्हाड मैनेशच्या डोक्यात मारली. यानंतर नीलेश भोसले, महेश भोसले व राजनंदिनी भोसले यांनी उमेशला धरले. मैनेशने उमेशवर कुऱ्हाडीने वार करत मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर संशयित एका महिलेसह चौघे तेथून फरारी झाले.
या हल्ल्यात गंभीर जखमी उमेश याला प्राथमिक उपचाराकरिता तरडगाव तसेच लोणंद येथील रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी दाखल करुन घेतले नाही. यानंतर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी जखमी उमेशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी पाहणी केली. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून चारही संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे. घटनेची फिर्याद उमेश काळे याच्या पत्नीने शिरवळ पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि राजकुमार भुजबळ पुढील तपास करीत आहेत.