पुणे – मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती आंबेगाव तालूक्यातील एका हॉटेलमधील कामगार आहे.
संजय बाबू कदम (वय 35, रा. घाटकोपर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष कांजळे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे आंबेगाव तालूक्यातील काटापूर गावातील हॉटेल आरती येथे येथे काम करत होता. तो मूळचा घाटकोपर येथील परेरावाडी येथील आहेत. सध्या तेथे त्याची बहिण रहात असल्याने तीला भेटण्यासाठी तो चालला होता. दोन दिवसांपूर्वी (सोमवारी) रात्री तो पुणे स्टेशन परिसरात बस पकडण्यासाठी आला होता.
दरम्यान बस न भेटल्याने तो साधू वासवणी चौकातून आलंकार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजय सेल्स समोरील बस स्टॉपवर झोपला होता. यादरम्यान मध्यरात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने डोळ्यांच्यावर आणि डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला.मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान खुन चोरीच्या उद्देशाने झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक महाजन यांनी दिलेल्या माहितीनूसार त्याच्या मालकाने त्याला जाताना चार हजार रुपये दिले होते. हे पैसे घेऊन तो घाटकोपरला जाण्यासाठी पुणे स्टेशन जवळ आला होता. त्याच्या जवळ हे पैसे न आढळल्याने चोरीच्या उद्देशाने खून केला असल्याची शक्यता वाटत आहे.