पुणे – अनैतिक संबंधाच्या संशयातून शाळेवर काम करणार्या सुरक्षारक्षकाचा टोळक्याने हल्ला करून कोंढव्यात खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीसह त्याच्या जखमी साथीदाराला रिक्षातून रहदारीच्या ठिकाणी सोडून आरोपींनी पळ काढला. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच एकच खळबळ उडाली. रवी कचरू नागदिवे (50, रा. नेवसेमळा, देवाची उरूळी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र बालाजी चव्हाण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत गुन्हे निरीक्षक गोकुळ राऊत यांनी सांगितले, रवी नागदिवे हे उरूळी देवाची येथील एका शाळेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांचा साथीदार बालाजी चव्हाण हा रिक्षा चालक आहे. रवी नागदिवे यांची 53 वर्षाची मैत्रिण आहे. तिचे येवलेवाडीतील डोंगराजवळ असलेल्या प्लॉटींगमध्ये घर आहे. त्या प्लॉटवरील एका खोलीत ती राहत होती. रवी हा तिला त्या ठिकाणी भेटण्यासाठी त्याचा मित्र बालाजी चव्हाण याच्या रिक्षात जात असत. दोन ते तीन वेळा बालाजी हा नागदिवे यांच्याबरोबर तेथे गेला होता. त्यानंतर नागदिवेनी उरूळी देवाची येथे राहणार्या एका महिलेशी बालाजीची ओळख करून दिली होती.
रविवारी नागदिवे, बालाजी हे दोघेजण येवलेवाडी येथील नागदिवेची मैत्रिण हिला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील प्लॉटींगच्या संबधीत सुपरवायझरसह इतरांना नागदिवेच्या संबंधीत महिलेशी गैरसंबंध असल्याचा संशय आला. तसेच तेथे असलेल्या खोलीचा वापर गैरकृत्यासाठी करत असल्याचाही त्यांना संशय होता. याच कारणातून सोमवारी दुपारी नागदिवे, बालाजीला संबंधीत सुपरवायझरने भेटण्यासाठी येवलेवाडी येथील त्या प्लॉटच्या ठिकाणी बोलविले. त्यावेळी नागदिवे हे त्याच्या कामावर होते. तर बालाजी हा शिवाजीनगर येथे त्याच्या रिक्षावर काम करीत होता. त्यानंतर नागदिवे आणि बालाजी उंड्री येथे एकत्र भेटले. त्यानंतर येवलेवाडीतील प्लॉटवर गेले. तेथे गेल्यानंतर संबंधीत सुरू असलेल्या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली.
नंतर याच कारणावरून तेथे उपस्थित असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना बांबूने लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. गंभीर मारहाणी नागदिवे याचा मृत्यू झाला. बराच वेळ नागदिवे आणि बालाजी याला जखमी अवस्थेत डांबून ठेवून नंतर तेथील दोन संशयीत आरोपींनी बालाजीच्या रिक्षात दोघांना कोंबले. नंतर त्यांना उंड्रीतील चौकाजवळील रस्त्यालगत सोडून दोघे तेथून पलायन केले.