Lok Sabha Election 2024 । भाजपने बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने याआधी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याचे भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
मात्र, त्या पक्षाने दुसऱ्या यादीत गडकरी यांना स्थान देताना महाराष्ट्रातील अनेक जागांचा सस्पेन्स संपवला. डॉ. सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली. तर, पुणे लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
आज मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहराचे ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. पुणेकर आपले मत भाजपला देतील, याचा मला विश्वास आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तेव्हा महायुतीचे सगळे नेते उपस्थित होते.
दरम्यान, मुरलधीर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी भाजपचे जगदीश मुळीक यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे जगदीश मुळीक काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्यांच्या या पोस्टला भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी लाईक केले असून शेअर केली आहे.
जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता मी कायम कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे.
जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद..!” असं जगदीश मुळीक आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. पक्षावर निष्ठा कायम ठेवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतूक केले आहे. भविष्यात आपल्यालाही उत्तम संधी मिळणार आहे, हा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. । Lok Sabha Election 2024